विज्ञान कोडी | विज्ञान रंजन
1. दिसतोय पाण्यासारखा रंग माझा लाल
प्रत्येक प्राण्यात आहे माझा संचार
घेतली आहे स्वतःला चार गटात वाटून
पुढे चालवितो जीवन प्राणवायू मिसळून
जर कराल मला दान
तर वाचल दुसऱ्याचे प्राण
ओळखा पाहू मी आहे कोण?
विज्ञान कोड्याचे उत्तर : रक्त
_________________________
2. स्वयंपोषी वनस्पतीची वैशिष्ट्ये महान
वनस्पतीच्या वाढीच्या प्रक्रिया छान
गरज असते सूर्यप्रकाशाची
पाणी आणि कार्बन-डाय-ऑक्साइडची
अन्न तयार करणारी प्रणाली वनस्पतीची
महत्त्वाची भूमिका हरितलवकांची
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : प्रकाश संश्लेषण
_________________________
3. पंख नाही तरी उडतो आकाशात
मानवाला घेऊन जातो नभात
दळणवळणाचे जलद साधन
वेगात उडतो जाळून इंधन
संशोधक माझे ऑरविल, विलबर
सेना ,संशोधन व प्रवासी वापर
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर : विमान
_________________________
4. राष्ट्रीय प्राण्याचा आहे मला सन्मान
अन्नसाखळीत आहे टोकाचे स्थान
तांबूस रंगावर नक्षीदार पट्टे काळे
डरकाळी ऐकून सर्व घाबरून पळे
तीक्ष्ण दात करडी नजर
दबा धरून पकडतो सांबर
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर : वाघ
_________________________
5. दळणवळणाची महत्त्वाचे साधन
वाहून नेते भारदार वजन
धावते धातूच्या रस्त्यावर
पोहोचते नेहमी अचूक वेळेवर
शरीर माझे लांबच फार
शिट्टी वाजून होते पसार
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर : आगगाडी
_________________________
6. खांबासारखे पाय माझे ,सुपासारखे कान
दात आहेत बाहेर माझे ,नाक आहे शान
मेहनती आहे मी, प्राणी बुद्धिमान
सर्कशीत भेटतो ,जरी असले डोळे लहान
विशालकाय देह ,आवड शाकाहार
जमिनीवरील प्राण्यात सर्वात जास्त वजनदार
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर: हत्ती
_________________________
7. मी उडते थाटात
सुंदर फुलांच्या घाटात
घर माझे षटकोणी
त्यात भरले गोड पाणी
इवले इवले पंख
असेल तर मारेल डंख
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : मधमाशी
_________________________
8. लोहाला आकर्षणाचा माझा स्वभाव
यावरूनच पडले माझे नाव
दक्षिण-उत्तर राहतो स्थिर
सजातीय द्रव व करतात एकमेकांना दूर
सभोवताली निर्माण करतो माझ्या क्षेत्र
माझ्या पासून बनवतात वीज निर्माण करणारे यंत्र
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर : लोहचुंबक
_________________________
9. फळ आहे रसदार
पोषक घटकांचा भरमार
आंबट-गोड सोमाजी खास
त्यासोबत येतो सुवासिक वास
नाव तसाच आहे सुंदर रंग माझा
साल कडून माझी दहा फोडी मोजा
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर : संत्रे
_________________________
10. पडलेला ॲपल पाहिलाय मी
गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलाय मी
सप्तरंगाची केलीय उकल
कॅल्क्युलस विकसनात झालो सफल
गतीचे नियम सांगितलेत तीन
बनविली पहिली परावर्ती दुर्बीण
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर : सर आयझॅक न्यूटन
_________________________
11. कवचधारी आहेत त्वचा माझी नाजूक
पाने खाऊन रोपाची मिटवतो भूक
सक्रिय असतो मी खूप रात्रीत
अंडे घालतो मऊशार मातीत
पाठीवर घेऊन फिरतो माझे घर
डोळे असतात माझे त्वचेच्या मिश्यावर
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर : गोगलगाय
_________________________
12. सर्वात मोठी ग्रंथी शरीरात
कोंबून ठेवली बरगड्यांच्या आत
आवरण मला संयोजी ऊतीचे
निर्माण करतो पित्त रसाचे
विषारी पदार्थांचा करतो नाश
मदत करतो चयापचयास
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर : यकृत
_________________________
13. शरीराचे सौंदर्य वाढवितो मी
लज्जा रक्षण करतो मी
निर्माण होतो कापूस पासून
रक्षण करतो ऊन वाऱ्यापासून
मला वापरणारा मानवा एकमेव सजीव
रंगीबेरंगी नक्षीदार रेखीव
ओळखा पाहू ! मी आहे कोण?
उत्तर : कापड
_________________________
14. सजीवांच्या शरीराचे बाह्य आवरण
आंतरेंद्रियांचे करते रक्षण
स्पर्शाची जाणीव देते करून
तापमान नियंत्रित करते घाम बाहेर काढून
उष्णता व थंडीपासून बचाव करते
शरीरातील आर्द्रता राखून ठेवते
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : त्वचा
_________________________
15. वस्तूच्या कंपनाने होतो मी निर्माण
कानामुळे होते माझे ज्ञान
सतारीच्या ताररातून निर्माण होणारे तत्व
कंपने असेपर्यंत असते माझे अस्तित्व
लहरींच्या स्वरूपात माझा प्रसार होतो
वायू, द्रव्य, स्थायु असा वेग वाढत जातो
ओळखा पाहू! मी आहे कोण?
उत्तर : ध्वनी
_________________________
16. मी आहे स्वयंपोषी करतो प्रदूषण कमी
माझ्या सानिध्यात मिळेल दीर्घ आयुष्याची हमी
जिथे मी असेल तिथे थांबवीतो जमिनीची धूप
धराल माझी संगत तर पाऊस पडेल खूप
माझ्यामुळे तुम्हाला प्राणवायू मिळतो
तुम्हाला सावली देऊन मी उन्हात तळतो
ओळखा पाहू ! मी आहेत कोण ?
उत्तर : झाड
_________________________
17. मी आहे एक जलचर प्राणी
मला म्हणतात पाण्यातील राणी
कल्याद्वारे घेतो ऑक्सिजन
पानवनस्पतींचे करतो भक्षण
आवडीने करतात माझे सेवन
पाणी हेच माझे जीवन
ओळखा पाहू! मी आहे कोण?
उत्तर : मासा
_________________________
18. कारखान्याच्या धुरात लपले माझे घटक
संयोग पाहून वाफेशी होतो प्राणघातक
सलफ्युरिक व नायट्रिक आम्लांचे तयार होतात ढग
पडतो विषारी पाऊस होऊन तेंव्हा त्रासून जाते जग
घातक द्रव्य मिसळतात जलसाठ्यात
पाण्यातील जलचर मृत्यू पावतात क्षणात
ओळखा पाहू ! मी आहे कोण?
उत्तर :आम्लवर्षा
_________________________
19.चव असते माझी आंबट गोड
वेलीला लागलेला असतो घड
पक्व फळ माझे आहे उत्तम खाद्य
काही प्रकारापासून बनवितात मद्य
रसाळ मृदुफळे गोलसर बांधणी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त आहे मागणी
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : द्राक्षे
_________________________
20. स्फटिक काचाचा त्रिकोणी आकार
प्रकाश किरण जातात आरपार
अपवर्तन होते प्रकाशाचे
अपस्करण करतो सप्त रंगाचे
किरण वळतात वेगवेगळ्या रंगातून
पांढरा प्रकाश बनतो सात रंगापासून
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : प्रिझम
_________________________
21.नाजूक मऊशार पांढरा पदार्थ
दरवळतो माझा झणझणीत सुगंध
कृत्रिम व नैसर्गिक होते माझी निर्मिती
जंतुनाशक मलमात असते उपस्तिथी
चटकन होते माझे ज्वलन
घडून येते स्वंप्लवन
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : कापूर
_________________________
22. निर्माण करतो मला वाहता वारा
अपारंपारिक स्रोतांचा वापर सारा
भविष्यात नाही संपणार कधी
प्राधान्य द्या मला सर्वात आधी
पहा ही जादू भिंगरीची
सुट्टी करतो प्रदूषणाची
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : पवनऊर्जा
_________________________
23. पडताच माझ्यावर सूर्यप्रकाश
बदलतो मी अदृश्य रुपास
उंच जातो हलका होऊन
सघन होतो गडगडाट करून
येतो खाली मिळताच गारवा
वाहत जाऊन मिळतो सागरा
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : जलचक्र
_________________________
24. संप्रेषणाचे साधन मी
नंबर लावताच वाजेन मी
अविष्कारक माझा मार्टिन कूपर
संगणकच आहे मी हातातील सुपर
संदेश माझ्यातून पाठवाल लघू
व्हिडीओ कधींपण शकाल बघू
ओळखा पाहू ! मी आहे कोण?
उत्तर : भ्रमणध्वनी
_________________________
25. शोधापासून होती ओळख मला ग्रहाची
खगोलतज्ञामध्ये होती भिंन्नता मतांची
ग्रहांच्या यादीतून केले मला बाद
खुजाग्रह म्हणून आता घालतात साद
सर्वाधिक लंबवर्तुळाकार कक्षा माझी खास
मिथेन , नायट्रोजन व बर्फाचा पृष्ठभाग
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : प्लुटो
_________________________
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.