Viral Post

5/recent/ticker-posts

श्रीमनाचे श्लोक अर्थासहित | १६ ते २० | समर्थ रामदास स्वामी

 

 ||श्री||

||जय जय रघुवीर समर्थ||

                                                                                   मनाचे श्लोक आणि अर्थ  




||मनीं मानवी व्यर्थ चिंता वहातें
अकस्मात होणार होऊन जातें
घडे भोगणे सर्वही कर्मयोगें
मतीमंद तें खेद मानी वियोगें||१६||

अर्थ:-

या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात कि मनुष्य या संसारामध्ये सर्व गोष्टींची चिंता करीत बसतो, हे काम पूर्ण होईल का? ते मला मिळेल का? असं झालं तर काय करायचं? अशा कितीतरी गोष्टी, चिंता त्याला भेडसावत असतात, समर्थ म्हणतात कि मनुष्य भविष्याची चिंता करत बसतो नि वर्तमानातील कालावधी व्यर्थ घालवतो. जे घडायचं आहे ते घडणारच आपण व्यर्थ चिंता करत बसू नये. भविष्याची चिंता करण्यापेक्षा आली घडी सार्थकास नेण्यास उत्तमता आहे, याचा जर विवेकबुद्धीने विचार केला तर आयुष्य सुखकर होऊन जाईल. जे नशिबात असते तेच घडते आणि नशीब हे आपल्या कर्मवरती अवलंबून आहे म्हणून भविष्याची चिंता न करता उत्तम कर्म करावे.


||मना राघवेंवीण आशा नको रे
मना मानवाची नको कीर्ति तूं रे
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे||१७||


अर्थ :-

समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या या विकारी आणि विषयांनी ग्रासलेल्या मनाला समर्थ रामदास स्वामी समजावून सांगतात कि हे मना तू श्री प्रभू रामचंद्रांच्या भक्तीची, त्यांच्या चरणाची, त्यांच्या उपासनेची, त्यांच्या शिकवणीची आशा धर, ज्या प्रभूला सर्व वेद, उपनिषद, वंदन करतात, पूर्ण ब्रह्मांड जो चालवितो असा प्रभू श्री रामाची ओढ असू दे. हा सगळा संसार आणि प्रपंच सर्व काही त्यातील विषय विकार त्याच्या चरणाशी अर्पण करून, त्याच प्रभूची आज्ञा समजून कर्तव्य आणि कर्माचे पालन करीत राहा.असे समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सांगतात.


||मना सर्वथा सत्य सांडूं नको रे
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे
मना सत्य ते सत्य वाचे वदावें
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावें||१८||

अर्थ :-

समर्थ रामदास स्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये सत्य आणि मिथ्य यातला फरक ओळखण्यास सांगतात. समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात कि हे मना तू सत्य काय आहे ते जाणून घे, सत्याची ओळख करून घे आणि सत्याची बाजू धरून ठेव. या संसार मायेच्या भावसागरामध्ये गुरफटून जाऊ नकोस आपली जीवनाची नौका पैलतीरावर नेण्यासाठी सत्याची ओळख करून घेणे अतिमहत्त्वाचे आहे. मग सत्य हे काय आहे, आपले शरीर?, सभोवतालच्या या सगळ्या दिसणाऱ्या वस्तू? असणारी परिस्तिथी? घडणाऱ्या गोष्टी? भावना आणि त्यातले विषय विकार? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत? त्यापासून बनलेली ही सृष्टी?
जे नष्ट होणार आहे, नाश पावणार आहे ते सर्व खोटं म्हणजेच मिथ्य आहे आपले शरीर हे नाक, कान, डोळे, हे सर्व अवयव, आपल्या सभोवताली दिसणाऱ्या या सर्व गोष्टी -गाडी, बंगला, पैसा इत्यादी.प्रारब्धामुळे येणारी परिस्तिथी ही तशीच राहत नाही ती सुद्धा बदलते, एवढंच काय ही सृष्टीसुद्धा एक मिथ्यच आहे (समर्थानी दासबॊधामधील -दशक सहावा "देवशोधन" मधील समास सहावा "सृष्टिकथान नाम "मध्ये सविस्तर सांगितले आहे. )या सृष्टीमध्ये असणारी ही पंचमहाभूत सुद्धा (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश )मिथ्यच आहे. ज्यावेळी ही सृष्टीच अस्तित्वात नव्हती त्यावेळी फक्त एक च शक्ती ज्यानं हे संपूर्ण ब्रह्मांड नि सर्वकाही निर्माण केल असा तो निर्गुण निराकार कर्ता करविता परमेश्वर अस्तित्वात होता नि अजूनही ही सर्व सृष्टी सामावून बसलेला आहे असा तो एकच सत्य आहे.

समर्थ म्हणतात कि जो सत्य आहे त्यालाच धर- परमेश्वराचा भक्तिमार्ग धर, जे मिथ्य आहे ते सोडून दे-विषय विकारांचा त्याग कर,जे सत्य आहे त्याचाच वाचन कर -गीता, उपनिषद, ग्रंथ ज्यातून उत्तम जीवनाची शिकवण मिळते तेच वाच, जे सत्य आहे त्याचाच गायन कर -फक्त त्या परमेश्वराचेच भजन कर.
असे समर्थ आपल्याला सांसारिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही मार्गानी फक्त सत्याचीच बाजू धरावयास सांगत आहेत.


||बहू हिंपुटी होईजे मायपोटीं
नको रे मना यातना तेचि मोठी
निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं
अधोमूख रे दुःख त्या बाळकासी||१९||

अर्थ :-

समर्थ रामदास स्वामी या मनाच्या श्लोकामध्ये विवेकाने सांगत आहेत कि, आईच्या पोटामध्ये असताना किती थोर नि वाईट यातना आणि दुःख होत होते, स्त्रीचे प्रत्येक महिन्याला अशुद्ध रक्त बाहेर पडत असते या रक्तालाच आपण विटाळ म्हणतो, गर्भवती स्त्रीच्या पोटामध्ये असा नऊ महिन्यांचा विटाळ अळून त्याचा गाळ होतो नि त्या गाळाचेच हे बाळाचे शरीर बनलेले असते. पोटामध्ये ते बाळ जणू नार्कातील तुरुंगवास भोगत असते (अंतरी म्हणे सोहं सोहं बाहेरी येता म्हणे कोहं ) गर्भात असताना खूप यातना होत असतात या नरकातून बाहेर निघण्यासाठी त्या परमेश्वराजवळ निवेदन असते कि मला या नारकवासनेतून बाहेर काढ मी बाहेर आल्यावरती तुज्याच आज्ञेत राहीन, निवेदन पास होऊन बाहेर आल्यावर मात्र त्याचे विस्मरण होते. आणि पुन्हा वाईट मार्गाचा अवलंब करतो. मग बाहेर हे संसारातले विषय विकार उत्तमाचा प्रपंच होऊन देत नाहीत आणि परमार्थापासून दूर करतात परिणामी पापाची भर पडते आणि पूर्वसंचित जसे असेल तसा पुन्हा जन्म मिळतो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात जीव अडकून पडतो. पुन्हा त्याच गर्भ नरक यातना सहन कराव्या लागतात.


|मना वासना चूकवी येरझारा
मना कामना सोडि रे द्रव्यदारा
मना यातना थोर हे गर्भवासी
मना सज्जना भेटवी राघवासी||२०||


अर्थ :-

हे प्रभू रामचंद्रा या तुज्या दासाला तुजा आज्ञेत ठेव, तुजा चरणाशी ठेव, नि विषयविकारांपासून अलिप्त करून या देहाकडून अखंड मंगलाचरण घडू दे नि या जन्म मृत्यूच्या भवसागरातून बाहेर काढून मोक्ष मिळवून दे.


||जय जय रघुवीर समर्थ ||

Post Navi

Post a Comment

0 Comments