||श्री||
||जय जय रघुवीर समर्थ||
मनाचे श्लोक आणि अर्थ
||नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नाना विकारी
नको रे मना लोभ हेय अंगिकारू
नको रे मना मस्त्रॊ दंभ भारू ||६||
अर्थ:-
समर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या रागाचे, मत्सराचे आणि वासनेचे विवरण देत आहेत. समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेल्या दासबोध या ग्रंथामध्ये पहिल्या दशकात "स्तवन नाम "पहिल्या समासात "मंगलाचरण " यामध्ये सांगतात कि -"अभिमानें उठे मत्सर |मत्सरे ये तिरस्कार |पुढे क्रोधाचा विकार प्रबळी बळे ||ऐसा अंतरी नासाला |कामक्रोधें खवळला अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसें ||कामक्रोधें लिथाडीला तो कैसा म्हणावा भला |अमृत सेविताच पावला मृत्य राहो ||"
समर्थ म्हणतात कि कोणत्याही विषयांचा अतिप्रमाणात वापर हा वाईट असतो. म्हणून विवेकाचा उपयोग करून विषयांचा वापर योग्य केला तरच संसार उत्तमाचा होऊ शकतो. एखाद्या गोष्टीबद्दल अभिमान बाळगू नये जर अभिमान जवळ ठेवला तर मत्सर सुद्धा मनामध्ये घर करतो, मत्सरामुळे तिरस्कार येतो, आणि शेवटी क्रोध जन्माला येतो. या सर्व विषयांमुळे मनुष्य अंतःकरनातून नासून जातो. असा व्यक्ती समाजात योग्य व उत्तमाचा व्यवहार व आचरण करू शकत नाही.
||मना श्रेष्ठ धारिष्ट जीवि धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावे
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसि रे नीववावे || ७||
अर्थ:-
समर्थ रामदास आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये धैर्य, सहनशीलतेची, नम्रतेची ओळख करून देतात. या सृष्टीमध्ये आपण जसे वर्तन करतो तसेच आपल्याला त्याचे प्रतिउत्तर मिळत असते. जसे व ज्याचे बीज पेरले जाते त्याचेच रोप उगवते, म्हणून जसे आपण कर्म करू तसेच आपल्याला फळ मिळते. विज्ञानाने सुद्धा हे मान्य केले आहे (Law Of Attraction-Every action there is equal and apposite reaction.)
सहनशीलता आणि धैर्य अंतःकरणामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मन चंचल न राहता शांत राहते, मनाची व बुद्धीची वैचारिक पातळी वाढते आणि बुध्दीमधे विवेक जागृत होतो व उत्तम कार्यभाग होतो परिणामी त्याचे फळदेखील उत्तम प्राप्त होते.
म्हणून समर्थ सांगतात कि समाजामध्ये कितीही निंदा झाली तरी ती आत्मसात करावी व क्रोध न करता नम्रतेची भावना ठेऊन समोरच्या लोकांना समजून घ्यावे आणि परिस्तिथिनुसार विवेकबुद्धीने धैर्य ठेऊन पाऊल उचलावे.
||देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी
मना सज्जना हेची क्रिया धरावी
मना चंदनाचे परी तवा झिजावे
परी अंतरी सज्जना नीववावे||८||
अर्थ:-
समर्थ रामदास आपल्या मनाच्या श्लोका मध्ये आपल्या मनाला जीवनाचा अर्थ समजावून सांगतात.या जीवनामध्ये, संसारामध्ये जेवढं काही दिसत आहे ते सर्व नश्वर आहे, मिथ्य आहे, कधी ना कधी ते नष्ट होणार आहे, गाडी, बंगला, पैसा इतकचं काय तर शरीर सुद्धा ही सर्व काही मोह माया आहे. जे दिसत नाही परंतु सर्व गोष्टींमध्ये सामावलेला आहे तो म्हणजे परमेश्वर तोच एक सत्य आहे. जो तिन्ही गुणांचा स्वामी असून निर्गुण निराकार आहे. जिवन हा एक पाण्याचा बुडबुडा आहे, कधीही नष्ट होऊ शकतो असा. जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणजे जिवन आहे. आणि हे अंतर उत्तम कर्माने पार पडले तरच मोक्ष प्राप्ती होते, वाईट कर्माने पुन्हा जन्म व मृत्यूच्या फेऱ्यात अडकून हे अंतर पार पडावे लागते. मृत्यूनंतर देह नष्ट होतो, उरते ते फक्त नाव आणि ते नाव त्या त्या देहाच्या कर्मानुसार टिकले जाते.
म्हणून समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात कि अशी कर्म करावीत कि मृत्यूनंतर सुद्धा कीर्ती राहील. जसं चंदन स्वतः झिजून इतरांना आपला सुगंध देतो अगदी त्याच प्रमाणे आपण उत्तम कर्माने आपला देह झिजवून समाजाचे, आपल्या राज्याचे, आपल्या देशाचे ऋण फेडायला हवे.
||नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
अति स्वार्थ बुद्धी नारे पाप सांचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
न होता मना सारिखे दुख: मोठे||९||
अर्थ :-
समर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला मत्सर, स्वार्थ, अपेक्षा या विकारांची माहिती देत आहेत. समर्थ म्हणतात की दुसऱ्याच्या सुखावरती, पैशावरती, वैभवावरती डोळा ठेऊ नये. परमेश्वराने आपल्याला जे दिल आहे त्याकडे पाहावे आणि त्यातच समाधानी राहावे तेच आपल्यासाठी उत्तम आहे. कारण जे आपल्यासाठी योग्य आहे तेच आपल्यासाठी परमेश्वराने दिलेले असते तेच उत्तमरीत्या सांभाळणे हेच आपले कर्तव्य आहे. "ठेविले अनंते तैसेचि राहावे |चित्ती असुद्यावे समाधान ||"
म्हणून दुसऱ्याच्या धनावर लक्ष न देता जास्त मत्सर न करता समाधानी राहावे. अतिस्वार्थ पापामध्ये भर घालतो. जास्तीची अपेक्षा दुःख्खाच कारण ठरते.
||सदा सर्वदा प्रीती रामी धरवी
सुखाची- स्वये सांडी जीवी करवी
देहे दुख हे सुख मानीत जावे
विवेके- सदा स्वस्वरूपी- भरावे||१०||
अर्थ:-
समर्थानी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये सांगितले आहे कि आपल्या परमेश्वरावर्ती, गुरुवरती प्रेम असावे.कारण तीच आपली माऊली आहे, सर्व दुःखातून, व्यापातून सोडवणारी आपल्याला समजून घेणारी माता आहे. गुरुचरणाशीच खरं सुख आहे, गुरुसेवेतच खरं वैभव आहे हे जाणून घ्यायला हवे. देह ही वरची माया आहे, जे काही भोग, व्याप, ताप असतील ते या मायेलाच मिळतात त्यात कोणत्याही प्रकारचे दुःख मानू नये, आपल्या कर्मानुसार नि पूर्वसंचितानुसार आपल्याला त्याची प्राप्ती होत असते.
म्हणून समर्थ मनाला विवेक धरून विचार करायला सांगतात कि शरीर हे मिथ्य असून आतला अंतरात्मा सत्य आहे तोच परमेश्वर असून त्याला आनंदी ठेवण्यायोग्य कर्म कर.
||जय जय रघुवीर समर्थ||
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.