||श्री||
||जय जय रघुवीर समर्थ||
मनाचे श्लोक आणि अर्थ
(manache shlok with meaning, spirituality, )
समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते ऋग्वेदी असून जमदग्नी हे त्यांचे गोत्र होते. ते सूर्योपासक होते. त्यांच्या पत्नीचे, म्हणजे गंगाधर-नारायणांच्या आईचे नाव 'राणूबाई ' होते.
श्री मनाचे श्लोक (manache shlok)
समर्थ अशाप्रकारे या श्लोकामध्ये हे सांगतात कि श्री गणेशस्वारी आणि सरस्वतीमातेला वंदन करून प्रभू रामचंद्रांच्या कधीही न संपणाऱ्या भक्तीच्या मार्गावरती वाटचाल करू.
"मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥"
अर्थ:-
समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला समजावत आहेत. जशी एखादी आई आपल्या लहान बाळाला समजावते अगदी तसंच, समर्थ म्हणतात कि हे मना, हे सज्जन मना भक्तीच्या मार्गावरती चल. आपल मन हे चंचल असत, ते कधी एका गोष्टीत तर कधी दुसऱ्या गोष्टीत गुंतलेलं असत. अशा मनाला नियंत्रणात आणायचं काम आपल आहे, जशी एखादी आई आपल्या मुलाला सांभाळते, त्याला वाईट गोष्टीपासून दूर करते आणि चांगल्या उत्तमाच्या गोष्टी शिकवते.अशा चंचल मनाला समर्थ म्हणतात कि हे माझ्या सज्जन मना, प्रभू रामचंद्रांच्या उत्तम अशा कधी न संपणाऱ्या मार्गावरती वाटचाल कर. त्या भक्तिमार्गावर ईश्वराची प्राप्ती त्वरित होते. समाजामध्ये जे काही निंदनीय असेल, वाईट असेल, विषयांचं असेल,विकारांच असेल ते सर्व सोडून दे आणि जे वंदनीय आहे, पूजनीय आहे त्याला आपलेसे कर. तरच व्याप, ताप, संसार यातून सुटका होईल नि मुक्ती मिळेल.
"प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥"
अर्थ:-
समर्थ रामदास स्वामींचे उपास्य गुरु श्री राम आहेत. समर्थ या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला सांगतात कि, पहाटे उठल्यावर प्रथम प्रभू श्रीरामचंद्रांचे नामस्मरण करावे. सर्व विश्वाची निर्मिती त्या ईश्वराने केली, जो निर्गुण निराकार आहे, प्रभू परमेश्वर आहे जो आपल्या अंतरंगामध्ये नांदत आहे, तो आपल्या आतमध्ये आहे म्हणून तर आपण ही सुंदर अशी पहाट पाहू शकलो, म्हणून तर त्याचे नामस्मरण करून घ्यावे. जी वैखरी आपल्याला मिळाली आहे ती त्या ईश्वरानेच दिली आहे, ज्यामुळे आपण आपला संसार आणि प्रपंच अगदी उत्तमाचा करत आहोत. आपली एखादी वस्तू जर आपण दुसऱ्याला दिली आणि त्याने ती निट वापरली नाही तर आपल्याला ते योग्य वाटेल का?
त्याचप्रमाणे ही वैखरी सुद्धा त्या ईश्वरानेच आपल्याला दिलेली आहे, त्या वैखरीतून जर आपण वाईट, विचित्र वाणी किंवा शिव्या शाप दिला तर त्या ईश्वराला योग्य कसे वाटेल.
त्या वैखरीचा सदुपयोग करून उत्तम वाणी जर ठेवली तर आपुलकी आणि समाजामध्ये मानसन्मान लाभेल, म्हणून या वैखरीतून द्वेष, निंदा, मत्सर, राग, अभिमानाची वाणी न म्हणता, प्रभू चे नामस्मरण करावे.
समर्थ या मनाच्या श्लोकामध्ये सांगतात कि हे मना सर्वप्रथम प्रभातकाळी त्या ईश्वराचे नामस्मरण करून त्याचे चिंतन करावे. हेच उत्तम आचरण आहे. जो हे आचरण उत्तम करतो तोच जगामध्ये, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवितो.
"मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥"
अर्थ:-
समर्थ रामदास स्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला सार काय नि असार काय म्हणजेच चांगल आणि वाईट याची समज देत आहेत. वासना हा सर्व विषयांमध्ये सर्वात वाईट विषय असून तेच पापकर्माचे मूळ आहे. वासना म्हणजेच आसक्ती, ओढ.वासने मधून आसक्ती जन्माला येते, आसक्तीमधून लोभ आणि स्वार्थ यासारखे विषय जन्माला येतात, त्यामुळे मती भ्रष्ट होते त्यातून क्रोधाची उत्पत्ती होते आणि परिणामी पाप कर्मात भर पडते.
म्हंणून समर्थ आपल्या मनाला दुष्ट वासनेपासून दूर राहून भक्तिमार्गाची आसक्ती धरायला सांगत आहेत. आपल्या मनाला समर्थ सार आणि असार यातला फरक समजावून सांगतात कि संसार, प्रपंच मध्ये हे जे विषय आहेत (काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार, संशय, चिंता ) यांचा योग्य प्रमाणात, उत्तम भावार्थाने सदुपयोग केला तर ती साराची बाजू होते आणि जर अतिप्रमाणात पापबुद्धीने दुरुपयोग केला तर ती आसाराची बाजू होते. म्हणून समर्थ असार सोडून सार घ्यायला मनाला सांगत आहेत.
"मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥"
अर्थ:-
समर्थ आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला समजावत आहेत कि पाप कर्म करण्याचे विचार धरू नको, विषय वासना खूप वाईट असते त्याचे अतिप्रमाणं पाप कर्माला कारणीभूत ठरते आणि नरकाचे दरवाजे खुले होतात.म्हणून नेहमी सदाचारी विचार आणि भावना मनामध्ये ठेवावी आणि उत्तम कर्माचा संकल्प करावा. मनामध्ये विषय विकारांची कल्पना धरून वाईट कर्म केल्यास समाजामध्ये आपली थू थू होते. म्हणून समर्थानी उत्तम कर्माचा संकल्प करावयास सांगितला आहे.
||जय जय रघुवीर समर्थ||