Viral Post

5/recent/ticker-posts

!! संस्कारक्षम संतती ही संपत्ती !! - लेखन:- श्री स्वप्नील शंकर पाटील ( प्रबोधनकारी व्याख्याते )

 

!! संस्कारक्षम संतती ही संपत्ती !!

                   लेखन :- श्री स्वप्नील शंकर पाटील

                                     कोरोनाच्या महामारीने आपली ‘ न भूतो’ अशी परिस्थिती केली आहे. मागील सहा महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’ आहोत. व्यापार, व्यवसाय , दळणवळण यांसह शिक्षण क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे, हे नाकारता येणार नाही. शिक्षण पुरवणाऱ्या शाळा बंद आहेत.आमची मुलं घरात आहेत. ‘शाळा बंद म्हणजे शिक्षण बंद’ अशी धारणा असणाऱ्या आपल्या सारख्या कित्येकांच्या मनात मुलांच्या भविष्याची चिंता जागली आहे. आता आमच्या मुलांचं कसं होणार ? या प्रश्नाने अक्षरशः जनमन ढवळून निघाले आहे. पण मुळात प्रश्न असा आहे की . शिक्षण कसं बंद होऊ शकतं? शिक्षण हि अनंतकाळ चालणारी प्रक्रिया आहे . त्याच्याही पुढे जाऊन शिक्षण हि सर्वक्षेत्री चालणारी प्रक्रिया आहे . शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास ही बाब मनात पक्की झाली की,  शिक्षण सर्व घटकांतून घेता येते . पशु , पक्षी , प्राणी अवघा निसर्गच आपला गुरु बनतो.

              शाळा हे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे माध्यम आहे आणि अभ्यासक्रमातून अपेक्षित मूल्य , संस्कार , नीती, यांची रुजवणूक ही परिसरातून होते. मी कितीही म्हटलं की मी शाळेत ‘प्रामाणिकपणा’ शिकलो , पण हा प्रामाणिकपणा जर मला माझ्या अवतीभोवती दिसला नाही तर त्या गुणाची रुजवणूक होऊच शकत नाही. मनुष्य हा अनुकरणशील आहे. निरीक्षणातून अनुकरण आणि अनुकरणातून व्यक्तिमत्वाची जडणघडण  होत असते. एवढी साधी गोष्ट लक्षात आली तर शिक्षण हे शाळेच्या चार भिंती आड होण्यापेक्षा ते बाह्य परिसरात अधिक होते हे लक्षात येते. याचा अर्थ शाळेतील शिक्षण टाळावे असा नाही तर शाळा हे समाजाचे लघुरूप आहे . समाजात कसे वावरावे याचे प्रशिक्षण शाळा देते . या प्रशिक्षणाचे प्रत्यक्ष अवलंबन मुल त्याच्या भोवतीच्या परिसरात करत असते.

                 सध्या शाळा बंद आहेत . मात्र शिक्षण ( अभ्यासक्रम ) सुरु राहावे यासाठी अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात केली आहे.शाळा शाळेचे कर्तव्य पार पाडत आहे. पण पालक म्हणून माझीही काही कर्तव्य आहेत ती मला पार पाडता यायला हवी.मागील काही महिन्यांपासून आपण आपल्या मुलांसहित घरी आहोत. महत्वाचे म्हणजे ‘मुलांसोबत’ आहोत. हा काळ मुलांना ओळखायला, पारखायला आणि घडवायला पूरक आहे. आमच्या धावपळीच्या आयुष्याला आलेला कोरोनारूपी ब्रेक आम्हाला मूळ रस्त्यावर घेऊन आलेला आहे. पालक म्हणून मुलांसमवेत वेळ घालवण्यासाठी मिळालेला हा काळ आहे. मुलांवर संस्कार घडविण्याचे काम आई करते. ते आईनेच करावे असे हि नक्कीच नाही पण आईविषयी मुलाची ओढ अनामिक व स्वाभाविक असते. त्यामुळे आईचा प्रभाव मुलांवर अधिक असतो आणि म्हणूनच आईने संस्कार करावेत अशी अपेक्षा धरली जाते. पण येथे महत्वाचा मुद्दा की , संस्कार हे घडवून होतात का हो ? तो संस्कार एखादी ठराविक व्यक्तीच करू शकते का ? नाही. मुळात संस्कार करून होत नसतात तर ते आपोआप घडत असतात.फक्त ते घडविण्यासाठीचे वातावरण आपल्याला तयार करावे लागते .आपण आपल्या पाल्यासमोर कोणते वातावरण उभे केले आहे या वरून त्याच्यावर कोणता संस्कार होणार आहे हे ठरत असते .आता आपण आपल्याला हवे तसेच वातावरण निर्माण करू शकतो का? म्हणजे बघा , बाजारात जातांना त्याने दोन गुंड गटांची मारामारी पाहिली, एखाद्या गल्लीत त्याने शिव्या देणारी मुलं पाहिली , टीव्ही वर त्याने मद्यपान करणारे हिरो पाहिले, या साऱ्यांचा काहीतरी परिणाम त्याच्यावर होणारच .मग हे वातावरण आपण बदलू शकत नाही पण या वातावरणामधील योग्य-अयोग्य, चांगल-वाईट , सत्य-असत्य हे आपण त्याला वेळीच पटवून दिले पाहिजे. त्याच्या मनात सकारात्मकता निर्माण होईल अशा पद्धतीने त्याला समजावले पाहिजे.

                      साडेतीनशे वर्षापूर्वी सुलतानशाहीच्या दहशतीखाली समाज भेदरलेलं आयुष्य जगत होता.तेव्हा मासाहेब  जिजाऊनी आपल्या शिवबाला दहशत न दाखवता ‘अन्याय’ समजावला. व न्यायासाठीची विवेकबुद्धी जागृत करून शिवबा घडवला.जिजाऊ पूर्वी येथील आयांनी आपल्या मुलांना दहशत स्वीकारून अन्याय भोगायलाच जणू तयार केले होते पण जिजाऊनी शिवबासमोर उभी ठाकलेली परिस्थिती दाखवून त्यातील न्याय अन्याय हि बाजू पटवून दिली. यातूनच पुढे ‘जाणता राजा ‘ घडला.

                   अर्थात प्रत्येक प्रसंगी आम्ही आमच्या मुलांसमवेत असूच असे नाही पण ज्या ज्या वेळी मी असेन त्या त्या वेळी कळत नकळत सुजाण पालक म्हणून मला माझ्या मुलाच्या सभोवतालच्या प्रसंगांचे विश्लेषण करताच यायला हवे .

                  अनेकदा पालक आणि मुलं यांचा संवाद न झाल्याने मुलांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलं समवयस्क मित्रांकडे शोधू लागतात.समवयस्क मित्र हा त्याच्याच विचार पठडीतला असल्याने गंभीर प्रश्नाला चुकीचे उत्तर मिळते.आणि यातूनच चुकीचे वर्तन घडते.

                पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबा , काका-काकू यांसारख्या वडिलधाऱ्यासमवेत असत. अलीकडे आई-वडील कामाला , मुलं शाळेत . नंतर घरी एकटेच असतात. मग पडलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारणार कोणाला ? आपण ‘नाळ’ हा चित्रपट पाहिला असेल. त्यातील चैतन्यला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याच्या शेजारी राहणारा मुलगा देतो. ‘ माझी आई कधी रडली असेल का रे?’ या चैतन्यच्या एका प्रश्नासाठी त्या मुलांनी केलेले दिव्य पाहिले की लक्षात येते , वेळीच एखाद्या मोठ्या व्यक्तीजवळ त्या मुलांनी बोलणे केले असते तर ?

                   काम ,क्रोध, माया , लोभ, मत्सर हे स्वाभाविक विकार आहेत.ह्यांना वेळीच दिशा देण्याचे काम करायला हवे. राग येणे वाईट नाही तर तो कशा पद्धतीने व्यक्त केला यावर त्याचे वाईटपण ठरते हे आपण पटवून मग मुलांना पटवून द्यायला हवे. माझ्या रागाने किती आणि कोणाचे नुकसान अथवा भले होणार आहे याचा सारासार विचार करण्याची बुद्धी आपण मुलांमध्ये तयार करायला हवी .अवतीभोवती घडणारे खून बलात्कार चोरी या घटना का घडतात? मुलं ह=गुन्हेगारीकडे का वळतात याचं एक उत्तर आहे . आम्ही विकारांना सकारात्मक वळण देऊ शकलो नाही.

                   सुजाण पालक म्हणून आपण मुलांना वेळ देऊ, सुसंवाद साधू . स्वप्न देऊ स्वप्नांना पंख देऊ आणि पंखात बळ भरू .कारण,


आपली संतती हीच खरी आपली संपत्ती आहे !!”

 

 

                                                                  *लेखक परिचय *
                                                                               श्री.स्वप्नील शंकर पाटील
                                                                                        ( प्रबोधनकारी व्याख्याते )
                                                                                                   शिक्षण :-एम.ए.बी.एड/डी.एड

Post Navi

Post a Comment

0 Comments