वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ
आपण काही वेळा बोलताना अशा शब्दसमूहाचा वापर करतो, की ज्यांचा शब्दशः वा सरळ अर्थ न होता . वेगळाच अर्थ होतो. 'मला कष्ट करण्याची सवय झाली आहे,' असे न म्हणता 'कष्ट करणे हे माझ्या अंगवळणी पडले आहे, असे आपण म्हणतो. अंगवळणी पडणे याचा अर्थ 'सवय झाली' असा होतो. 'काम यशस्वी होण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले,' असे न म्हणता काम यशस्वी होण्यासाठी त्याने 'जिवाचे रान केले' असे म्हणतो. 'जिवाचे रान केले' याचा अर्थ 'खूप प्रयत्न केले' असा होतो.
'अंगवळणी पडणे' , 'जिवाचे रान करणे' अशा शब्दप्रयोगांना 'वाक्प्रचार' असे म्हणतात. वाक्प्रचारांत मोठा अर्थ दडलेला असतो. त्यांच्या वापरामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.
माणसांच्या वर्तनावरून, स्वभावावरून, परिसरातील वस्तूंवरून तसेच शारीरिक अवयवांवर आधारित असे अनेक वाक्प्रचार तयार झालेले आहेत. असे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ समजून घेऊ......
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
शारिरीक अवयवांवर आधारित वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ :
💢 डोक्यावरून :
डोक्यावर हात लावून बसणे - विचार करीत बसणे
डोक्यावर खापर फोडणे - निर्दोष माणसावर दोष टाकणे
डोक्यावर बसवणे - फाजील लाड करणे
💢 कपाळावरून :
कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे
कपाळाला हात लावणे - नाराजी दाखवणे
💢 तोंडावरून :
तोंडाला पाणी सुटणे - हाव निर्माण होणे
तोंड काळे करणे - कायमचे निघून जाणे
तोंड देणे - आलेल्या प्रसंगाशी सामना करणे
तोंड फिरवणे - नाराजी व्यक्त करणे
तोंडात बोटे घालणे - आश्चर्यचकित होणे
तोंडातून शब्द न फुटणे - खूप घाबरणे
💢 डोळ्यांवरून :
डोळा लागणे - झोप येणे
डोळे उघडणे - अनुभवाने सावध होणे
डोळ्याला डोळा न लागणे - झोप न येणे
डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे
डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे
💢 कानावरून :
कान उपटणे - कडक शब्दांत समज देणे
कान टोचणे - कडक शब्दांत चूक लक्षात आणून देणे
कानांवर हात ठेवणे - नाकबूल करणे
कानोसा घेणे - अंदाज घेणे, चाहूल घेणे
💢 नाकावरून :
नाक उडवणे - थट्टा करणे
नाक कापणे - अपमान करणे
नाक मुरडणे - नापसंती दाखवणे
नाक घासणे - लाचार होऊन माफी मागणे
💢 दातावरून :
दात धरणे - सूड घेण्याची भावना बाळगणे
दात ओठ खाणे - चीड व्यक्त करणे
दाती तृण धरणे - शरण येणे
💢 पोटावरून :
पोटात आग पडणे - खूप भूक लागणे
पोटात कावळे कोकलणे - खूप भूक लागणे
पोटात ठेवणे - माहीत झालेले गुपित उघड न करणे
पोटाला चिमटे घेणे - काटकसरीने राहणे
💢 पाठीवरून :
पाठ थोपटणे - कौतुक करणे, शाबासकी देणे
पाठ पुरवणे - सारखे मागे लागणे
💢 हातावरून :
हातचे जाणे - तावडीतून निसटणे
हात टेकणे - नाईलाजाने शरण जाणे
हात आखडता घेणे - देण्यासाठी स्थिती असतानाही कमी देणे
हात झटकणे - नामानिराळा होणे
हात देणे - मदत करणे
💢 कंबरेवरून :
कंबर कसणे - जिद्दीने तयार होणे
कंबर खचणे - धीर सुटणे
💢 पायावरून :
पाय घसरणे - वर्तन बिघडणे , तोल जाणे
पाय धरणे - शरण जाणे , माफी मागणे
पाय मोकळे करणे - फिरायला जाणे
पायावर उभे राहणे - स्वावलंबी होणे
💢 अंगावरून :
अंग चोरणे - फारच थोडे काम करणे , हळूहळू काम करणे
अंगाची लाही लाही होणे - अतिशय संताप येणे
💢 जिवावरून :
जिवात जीव येणे - सुटकेची भावना होणे , हायसे वाटणे
जिवाला जीव देणे - कोणत्याही प्रसंगात दुसऱ्याला मदत करणे
जिवाचे रान करणे - खूप प्रयत्न करणे
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.